इकडेही लक्ष द्या...

न्यू इअर, राजकारण, खेळ आणि बऱ्याच अतिमहत्वाच्या गोष्टीत एक बातमी विरून गेलीय...
जेंव्हापासून ही बातमी ऐकलीय तेंव्हापासून आपण माणूस म्हणून राहायच्या लायकीचे आहोत का हा प्रश्न पडतोय.
तर बातमी अशी होती की, सात मुलींच्या जन्मानंतर आठव्या मुलाच्या प्रसुतीनंतर मातेचा आणि त्या मुलाचाही मृत्यू. एकतर सध्याच्या काळात ही अशी बातमी येते हीच खूप शरमेची बाब असून, जग कुठे चाललय आणि आपण काय करतोय हे दाखवून देणारी आहे. आपण एकीकडे गगनयान, बुलेट ट्रेनच्या बाजारगप्पा मारत असताना ह्या अशा प्रश्नाचे महत्व आपल्याला समजून येत नाही हेही खरय. चकाचक बातम्यांच्या राड्या रोड्यात ही बातमी कुठेतरी कोपऱ्यात येतेय... तो कोपराच आता खऱ्या मिडीयाचा आरसा आहे, बाकी सर्व जाहिरातीनी आणि निरुपयोगी राजकारणामध्ये अडकलाय.

जेवढी जास्त लोकसंख्या वाढवता येईल तेवढी वाढवा असे सांगणारे धर्माचे कर्तेधर्ते ह्या मायलेकांच्या मृत्युबद्दल एक अवाक्षर ही काढणार नाहीत. लोकसंख्यावाढ ही धर्मोत्थानाची चळवळ असल्यासारखे त्यांचे बोलणे ह्या मायलेकांचा जीव परत आणू शकतील का? आणि हे कोणत्या स्पेसिफिक धर्माबद्दल बोलत नाहीय मी. सगळ्याच धर्मातून अशा प्रकारची वक्तव्ये करणाऱ्या महत्तम होपलेस धर्मरक्षक पुढाऱ्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये बऱ्याच वेळा केलेली आहेत.

त्यांचे सोडा हो त्या नवजात मृत्युमुखी पडलेल्या पोराच्या बापालाही याबद्दल किती शल्य असेल याच्याबद्दलही माझ्या मनात शंका आहे. जग बदलत असताना पोरी आपल्या गुणवत्ता सिद्ध करत असताना, अशा प्रकारची बातमी येते हे आपण समाज म्हणून खूप मागे असल्याची जाणीव करून द्यायला बस आहे.

वाईट एवढच वाटत की ह्यावर कसलीही चर्चा होत नाही. ह्यावर कसलाही उपाय शोधला जात नाही. ह्या शुद्ध नालायकपणाला महिलाही मूक संमती देतात. किंबहुना आपला जीव जाईपर्यंत देखील त्या बोलत नाहीत. महिला सक्षमीकरण फक्त कागदावर होऊ नये म्हणून बोलावसं वाटलं.... किंबहुना ह्यावर थोडं जरी काही करता आलं तर मी स्वतःला भाग्यवान समजेल.


अनुप.
© Anup Nalawade, 2019. All rights reserved. (Published at Pune on 01/01/2019)

Comments

Post a Comment