तेल मीठ भाकरी...
आत्ता आपलं हॉटेल आहे. जे पाहिजे ते आणि पाहिजे तसं फक्त
ऑर्डर केलं की तयार होतयं आणि खायला मिळतय... आता अशी सुरुवात केली की वाटेल एखादी
मोठी सक्सेस स्टोरी बिरी सांगतो का काय, पण तसं काही नाही...
आपल्या घरची परिस्थिती काय एवढी खराब नव्हती... किंबहुना
चांगलीच होती... आई बाप शिक्षक. त्यामुळं भरपूर व्यवस्थित म्हणल तरी चालेल. पण
त्यांची परिस्थिती एकदम खराब नसली तरी फारफार तर दोन वेळचं पोटभर जेवण मिळेल एवढी
बरीच होती. तर विषय काय आहे आजचा की आज आमची आक्का आठवली. आक्का म्हणजे आमची आज्जी,
वडिलांची आई... आमचे वडील चौथे म्हणजे त्यांच्या आधी तिघे... त्यात तिघांची सगळी
पोरं म्हणजे आमची चुलत भावंड सगळी आमच्यापेक्षा मोठीच. म्हणजे मी ह्या दुनियेत
यायच्या आधी तिला दहा नातवंड अलरेडी होती... म्हणजे मोठ्या तिघांची प्रत्येकी तीन
आणि आमच्या वडिलांपेक्षा लहान चुलत्याची पहिली मुलगी... अशी टोटल दहा जण... त्यामुळे
ते नातवंड याबद्दलच नवीन नवीन आकर्षण वगैरे सगळं तिला जुनं झालेलं असेल... आमच्या
अक्ख्या परिवारात लेडीज मध्ये आमची आई फक्त नोकरीला... मग आपसूकच शाळेला आई गेली
की आमची आक्का आणि काकूच आम्हाला सांभाळायची... आता हे सगळ आम्ही आमच्या घरातील
मोठ्या माणसांकडूनच ऐकलय... आपल्याला काय घंटा कळत नव्हत तेंव्हा...
मग थोडावेळ आठवणीत गेलो... मोबाईलमध्ये अलीकडे करतोय
त्या टाईमपास पेक्षा अशा आठवणी कधीतरी आठवत बसाव्यात... आयुष्यात आपण काय कमावलं,
काय गमावलं ह्या हिशोबापेक्षा अशा आठवणी मनात असाव्यात ज्या आपल्याला कधीही फुकट
उजळणी करता याव्यात... आक्का... आठवणाऱ्या सगळ्या व्यक्तीत सगळ्यात प्रेमळ...
आता जेंव्हा समजत होतं थोडं थोडं तेंव्हापासुनच्या काही
आठवणींचा कोलाज आला मनात...आम्ही सकाळी उठलो उठलो की आमची संडास धुण्यापर्यंतच सगळं
contract तिच्याकडेच... मग सकाळी सकाळी सगळ आवरलं की चुलीजवळ बसलेल्या आक्काकडे
जायचं... आक्का लाडात घ्यायची... कुरवाळायची आणि मग चुलीवर तापत ठेवलेल्या दुधाच्या
मोठ्या पातेल्यातुन एक ग्लास दुध काढायची... त्यात साखर घालून त्याला चमच्याने ढवळत
दुध निवायला ठेवायची... आणि तो एक ग्लास रिचवून होईपर्यंत मग तिच्या तावडीतून
सुट्टी नसायची... आताच्या पोरांना मिळणाऱ्या बूस्टपेक्षा त्याची चव जास्तच गोड
लागायची... साखर आणि दुधापेक्षा तिची माया चवदार असेल नाही का? आमच्या आईबापांनी लहान
असताना किती वेळ आमच्याकडे लक्ष दिलयं काय माहिती नाही पण लहानपणी सर्वात जास्त
वेळ गेला असेल तर तो आक्का बरोबर... ती एक चार्म होती... आम्ही शाळेला निघालो की
माया करताना तिच्या खरमुड्या हातांनी तोंडावरून बोटं फिरवत बोटं मोडून कौतुक
करायची... ही अशी कौतुकं आता मिळतं नाहीत... तिने शिवलेल्या वाकळामध्ये आमचं अक्ख
बालपण गेलय... तिला आमची नावंही व्यवस्थित घेता येत नसायची पण तिच्या त्या नावं न
घेता येण्याचा आम्हाला कधीच फरक पडला नाही... “अनुप” नाही ती “आनीप” म्हणायची...
पण ते भारी वाटायचं... तिला आपल नावं समजून सांगत बसायचो, की अस नाही ग आक्का असं
आहे म्हणून... ती हसायची... एकदम काटक... खूप लहान तब्येत... पण एकदम काटक... आज
ती एकदम खूप आठवावी एवढा सहवास आम्हाला काही मिळाला नाही पण जेवढा मिळाला त्यात
पंचपक्वान्नाच जेवण जरी नव्हतं तरी पण तिने तिच्या मायेने भरवलेली तेल मीठ लावून
चवदार बनवलेली गरम भाकरी मात्र खूप आठवते... डोळ्यात पाणी येतं थोडं... आपल्या
आयुष्यात ज्या माणसांनी येऊन आपलं जगणं समृध्द केलेलं असतं त्यातील ही एक...
त्या वयात एवढी समज नव्हती आणि समज यायच्या वयात आक्का
नव्हती... असो... चालायचचं...
Nice
ReplyDelete